Ad will apear here
Next
असा घडला ‘बिपिन टिल्लू’ आणि ‘श्याम सारंगपाणी’...
प्रथमेश देशपांडे

‘तुला पाहते रे’ या ‘झी मराठी’वरील लोकप्रिय झालेल्या मालिकेतील ‘बिपिन टिल्लू’ आणि नुकत्याच नव्याने रंगभूमीवर आलेल्या ‘अश्रूंची झाली फुले’ या वसंत कानेटकर लिखित नाटकातील ‘श्याम सारंगपाणी’ या दोन भूमिकांमधून रसिक प्रेक्षकांना आवडलेला अभिनेता म्हणजे प्रथमेश देशपांडे. त्याच्या पहिल्यावहिल्या भूमिका, त्या भूमिकांच्या यशाचे रहस्य आणि त्याचा इथपर्यंतचा प्रवास जाणून घेण्यासाठी त्याच्याशी साधलेला हा संवाद...
......................
नमस्कार. तुझं वैयक्तिक आयुष्य, कुटुंब आणि अभिनयाची सुरुवात याबद्दल थोडंसं सांग.
- माझा जन्म डोंबिवलीचा. माझं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मी मुंबईत पूर्ण केलं. पार्ल्याच्या डहाणूकर कॉलेजमधून पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर मणिपाल विद्यापीठातून ‘मीडिया एन्टरटेनमेंट’मध्ये एमबीए पूर्ण केलं. माझे बाबा अभियंता असून, आईदेखील नोकरी करते. लहान भाऊदेखील एका चांगल्या कंपनीत नोकरी करतो. शिक्षण पूर्ण केल्यानंतर रीतसर नोकरी करण्याचं ठरलं आणि दूरदर्शनमध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून रुजू झालो. चार वर्षं कामही केलं. सुरुवातीपासूनच मला अभिनयाची आवड होती. शाळेत, कॉलेजात असताना नाटकांमधून अभिनय केला. पुढे काही वर्षं शिक्षण आणि नोकरी या सगळ्यांत या गोष्टी दुरावल्या. परंतु अभिनयाची खुमखुमी स्वस्थ बसू देत नव्हती. सगळं असूनही काहीतरी ‘मिसिंग’ असल्याची भावना होती. शेवटी नोकरी सोडून आपल्याला करिअर करायची इच्छा असलेल्या अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवायचं, असं ठरवलं. घरच्यांनी सुरुवातीला साफ नकार दिला. परंतु त्यांना शांतपणे हे सगळं पटवून दिल्यानंतर त्यांनी माझ्या या निर्णयाला परवानगी दिली, मला साथ देण्याचं ठरवलं आणि अखेर माझा अभिनयाच्या वाटेवरचा प्रवास सुरू झाला.

ऑडिशन्स आणि पहिलं काम या गोष्टींचा अनुभव कसा होता?
- नोकरी सोडल्यानंतर आता मी पूर्ण वेळ अभिनयासाठी देऊ शकतो, याचा आनंद होता. परंतु तेव्हा हातात काहीच नव्हतं. जवळपास दोन वर्षं मी मिळेल ती, असेल तेव्हा, अशा कित्येक ऑडिशन्स दिल्या. एका मालिकेसाठीची ऑडिशन इतकंच माहिती असताना ती द्यायची ठरवलं आणि ती दिलीही. त्यानंतर साधारण दोन महिन्यांनी एक फोन आला, त्या मालिकेतील एका पात्रासाठी माझी निवड करण्यात आली होती. निवड झाल्यानंतर ती मालिका ‘झी टीव्ही’ची आहे आणि सुबोध भावेंसोबत मला काम करायला मिळणार आहे, हे समजल्यावर मला पहिल्याच ‘ब्रेक’मध्ये खूप काही मिळाल्याचा आनंद झाला. ती भूमिका होती ‘तुला पाहते रे’ या ‘झी मराठी’ वाहिनीवरील मालिकेतील ‘बिपिन टिल्लू’ची. ही भूमिका म्हणजे माझ्या करिअरची सुरुवात होती आणि खऱ्या अर्थाने तीच भूमिका टर्निंग पॉइंटही ठरली. 

स्वतःची मतं नसलेला, एक बावळट मुलगा अशी ‘बिपिन टिल्लू’ची भूमिका आहे. ती का करावीशी वाटली? बिपिन टिल्लूला इतकी प्रसिद्धी मिळण्यामागचं कारण काय असावं असं वाटतं?
- खरं तर ती माझी सुरुवातच असल्यामुळे तेव्हा अगदी मिळेल ती भूमिका करण्याची माझी तयारी होती. मालिकेतील बिपिनच्या भूमिकेसाठी माझी निवड झाल्याचं समजल्यानंतर ती भूमिका कशी आहे, ते मला समजावून सांगण्यात आलं. भूमिका करताना त्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करून त्यात शिरून ती करता आली पाहिजे, हे तत्त्व सुरुवातीपासूनच सांभाळलं होतं. त्यामुळे बिपिनची भूमिका करताना दिग्दर्शकांना अपेक्षित असा बिपिन मला करता आला आणि तो प्रेक्षकांना ‘अपील’ही झाला. आवडला. मुळात बावळट, मतं नसलेला असा असला, तरी बिपिन वेड्यासारखा वागणारा कुठेच नव्हता. एका विशिष्ट मर्यादेतला शहाणपणा, समंजसपणा त्याच्याजवळ आहे. वेळप्रसंगी एक ठाम भूमिका घेतलेला, ईशाला मदत केलेला, तिची बाजू समजून तिला नेहमीच एक मित्र म्हणून साथ दिलेला बिपिन पाहताना तो बावळट वाटत नाही. त्याहीपेक्षा त्याच्यातली निरागसता, एक सच्चेपणा आणि चेहऱ्यातला ‘क्यूटनेस’ याच कारणांमुळे तो प्रेक्षकांना खूप भावला असावा. याच गोष्टींमुळे बिपिन मालिकेतील मुख्य पात्रांच्या रांगेत येऊन बसला. त्याला लोकांनी लक्षात ठेवलं. 

‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकातल्या ‘श्याम सारंगपाणी’ या तुझ्या दुसऱ्याच भूमिकेनेदेखील तुला आणखी एक नवी ओळख दिली, असं वाटतं का? सलग सात प्रयोग हाऊसफुल झालेल्या या नाटकातील भूमिकेबद्दल काय सांगशील?
- ‘बिपिन टिल्लू’च्या भूमिकेने मला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम दिलं. सुरुवात छान झाली याचा आनंद नेहमीच आहे. दुसरी नवी भूमिकाही पुन्हा सुबोध भावे यांच्यासोबत आणि तीही थेट वसंत कानेटकरांसारख्या दिग्गजांच्या नाटकात हा मात्र माझ्यासाठी आश्चर्याचा सुखद धक्का होता. माझं ‘तुला पाहते रे’मधलं काम पाहून एक दिवस मला सुबोध सरांनी ‘नाटकात काम करशील का?’ असं विचारलं. मी अर्थात लगेचच ‘हो’ म्हटलं. ‘प्रतिमाताईंना भेट, त्या तुझ्याशी पुढचं सगळं बोलतील,’ असं मला सांगितलं गेलं. त्या प्रतिमा कुलकर्णी आहेत, हे समजल्यावर तो माझ्यासाठी पुन्हा एक सुखद धक्का होता. श्याम सारंगपाणी ही भूमिकादेखील मी पूर्णपणे त्या पात्रात शिरून करण्याचा प्रयत्न केला आहे. खरं तर नाटकातील कथेप्रमाणे श्याम हे पात्र मुख्य पात्रांमध्ये येत नाही. परंतु नाटकाच्या कथानकातल्या श्यामच्या पात्रामुळे घडणाऱ्या घटना सर्वच मुख्य पात्रांच्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या आहेत. यांमुळे हे पात्रदेखील मुख्य पात्रांप्रमाणे लक्षात राहणारं असं आहे. 

अभिनयासाठी मराठी भाषेवर काम केलं का? हिंदीत संधी मिळाली, तर काम करायचं ठरवलं आहे का?
- लहानपणापासून मुंबईत असल्यामुळे आणि त्यातही अंधेरीत असल्यामुळे आजूबाजूला हिंदीभाषक जास्त होते. त्यामुळे मराठीपेक्षाही माझं हिंदी चांगलं आहे. यामुळेच अभिनयाच्या क्षेत्रात येण्याचं ठरवल्यानंतर सुरुवातीला हिंदीच ऑडिशन्स दिल्या. माझी मराठीही खूप चांगली आहे आणि मी निश्चितच मराठीतही काम करू शकेन, असं माझ्या काही मित्रांनी माझ्या लक्षात आणून दिलं. त्यानुसार मराठीकडे मोर्चा वळवला. मराठी भाषेवर काम केलं. उच्चार, जास्तीत जास्त मराठी शब्दांचा वापर, नवीन शब्दांचा वापर या गोष्टी जाणीवपूर्वक अभ्यासल्या. त्यामुळे मालिकेत पहिली भूमिका मिळाल्यानंतर ती आत्मविश्वासाने करता आली. हिंदीमध्ये काही काम मिळालं, तर अर्थात तेही नक्कीच करेन. काम करण्यासाठी सध्या तरी कोणतंच बंधन मी स्वतःवर घातलेलं नाही. 

अभिनयाव्यतिरिक्त आणखी कोणत्या गोष्टींची विशेष आवड आहे?
- मला सर्वांत जास्त आवड आहे ती वाचनाची. मी आजवर खूप वाचलं आहे. अजूनही वेळ काढून वाचतो. मराठी, हिंदी, इंग्रजी असं काहीही वाचायला मला आवडतं. विशेषतः सर्वच क्षेत्रांतल्या यशस्वी, दिग्गज आणि नामवंत लोकांची चरित्रं वाचायला मला आवडतात. यातल्या प्रत्येकानं आयुष्यात चढ-उतार अनुभवलेले असतात. ते त्यात वाचायला मिळतं. स्वतः चुका करून त्यातून शिकण्यापेक्षा इतरांच्या चुकांमधूनही शिकण्यासारखं खूप असतं. हीच गोष्ट चरित्रांमधून शिकायला मिळते. आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर काय केलं पाहिजे, काय करता कामा नये, याबाबत चरित्रांमधून खूप शिकायला मिळतं, असं मला वाटतं. त्यातून जसे धडे मिळतात, तशीच प्रेरणाही मिळते. आपण जे करत आहोत, त्याला नक्कीच काहीतरी अर्थ आहे आणि ते जोमानं करत राहिलं पाहिजे, यासाठीची उमेद मिळते. मला खेळांचीही आवड आहे आणि मी खेळतोही. लेखनाचा फारसा प्रयत्न कधी केला नाही; पण तोही करण्याचा विचार आहे.

तुझ्या आजवरच्या आयुष्यावर कोणाकोणाचा प्रभाव आहे असं वाटतं?
- सर्वांत पहिली प्रेरणा मला मिळाली ती माझ्या घरातूनच. माझी आई, बाबा आणि माझा भाऊ आशुतोष यांनी मला खूप सहकार्य केलं आहे. फार आध्यात्मिक नसलो, तरी भगवान हनुमान आणि शेगावचे गजानन महाराज यांच्यावर माझी श्रद्धा आहे. त्यांचा माझ्या आयुष्यावर कळत-नकळत का होईना नक्कीच प्रभाव आहे. ‘तुला पाहते रे’ मालिका आणि ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकामुळे ज्या ज्या लोकांशी मी जोडलो गेलो, ते सगळेच माझ्या आजवरच्या प्रवासात महत्त्वाचे आहेत. त्यातही विशेषतः ‘राइट क्लिक मीडिया सोल्युशन्स’चे अपर्णा केतकर आणि अतुल केतकर, यांच्यासह शेखर ढवळीकर, शर्वरी पाटणकर आणि अभिजित गुरू (म्हणजे या मालिकेचे अनुक्रमे लेखक, पटकथालेखक आणि संवादलेखक), ‘झी मराठी’चे चंद्रकांत गायकवाड, प्राची शिंदे, सोजल सावंत या सर्वांचे विशेष आभार. सुबोध भावे, गायत्री दातार आणि इतर सर्व कलाकार, या प्रत्येकाकडून मी काही ना काही शिकलो आहे. ‘अश्रूंची झाली फुले’ हे माझं पहिलं नाटक. यातही सीमा देशमुख, शैलेश दातार, उमेश जगताप आणि पुन्हा सुबोध भावे यांच्यासारख्या दिग्गजांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. दिग्दर्शिका प्रतिमाताई कुलकर्णी, दिनेश पेडणेकर, मंजिरी भावे आणि अभिजित देशपांडे या सगळ्यांचाही नक्कीच माझ्यावर प्रभाव आहे, असं मी म्हणेन.

अभिनयाच्या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या नवोदित कलाकारांना काय सांगशील?
- खरं तर सर्वांत आधी मी असं म्हणेन की नवोदित वगैरे काही वेगळं नसतं. कोणतंही नवीन काम करताना कलाकार त्या कामासाठी नवोदितच असतो. कारण प्रत्येक भूमिका वेगळी असते. प्रत्येक भूमिकेचं आव्हान वेगळं असतं. आपण फक्त एकच करू शकतो. मेहनत, मेहनत आणि मेहनत. योग्य आणि नैतिक पद्धतीने मेहनत करत राहिलं, तर कोणतंही काम अवघड नाही असं मला वाटतं. त्यामुळे आत्मविश्वास वाढवा, गॉडफादर शोधू नका आणि शक्य तेवढी मेहनत करा, इतकंच मी सांगेन आणि मीही तेच केलंय हे नमूद करेन. 

(प्रथमेश देशपांडेच्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)



BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZSYCA
 मुलाखत मस्त, प्रथमेश देशपांडे याचं प्रामाणिक कथन!!! पुढल्या प्रवासासाठी अनेक शुभेच्छा2
 Prathamesh is right actor for marathi films and drama.तो अगदी त्याला दिलेल्या पात्राच्या आंत शिरून जीवंत अभिनय करतो. अशीच पुढे प्रगती करत रहा. आशिर्वाद
Similar Posts
‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने... ‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्या निमित्ताने, डॉ. काशिनाथ घाणेकर यांची कलेवर असणारी निष्ठा दर्शविणारी एक हृद्य आठवण सांगत आहेत रत्नागिरीचे अॅड. धनंजय भावे.
‘विक्रांत-ईशा’ची स्टायलिस्ट मुंबईची, तर गुरुजी पुण्याचे पुणे : सध्या सगळीकडे चर्चा आहे ती ‘विकीशा’च्या लग्नाची. ‘विकीशा’ म्हणजे तेच ते विक्रांत सरंजामे आणि ईशा निमकर. ‘तुला पाहते रे’ या झी मराठी वाहिनीवरील मालिकेतील बिझनेस टायकून विक्रांत सरंजामे आणि चाळीत राहणारी ईशा निमकर यांच्या शाही लग्नाची जय्यत तयारी हा सध्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय आहे.
‘तुला पाहते रे’च्या शूटिंगचा शेवटचा दिवस मुंबई : अत्यंत कमी वेळात प्रेक्षकांच्या मनाची पकड घेत घराघरात स्थान मिळवलेली झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘तुला पाहते रे’ आता शेवटाच्या उंबरठ्यावर असून नुकतेच या मालिकेचे शूटिंग संपले आहे. अभिनेत्री अभिज्ञा भावेने हे सांगत सोशल मिडियावर काही फोटोज शेअर केले आहेत.
सुबोध भावे म्हणतोय ‘दुनिया गोल है’ पुणे : ‘तुला पाहते रे’ या झी मराठी वाहिनीवरील मराठी मालिकेची सध्या बरीच चर्चा आहे. यातील इशा म्हणजेच गायत्री दातार आणि विक्रम सरंजामे म्हणजे सुबोध भावे यांचा एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. स्वतः सुबोध भावे यानेही आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत सुबोधच्या हस्ते एका लहान मुलीला बक्षीस मिळाल्याचे दिसत आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language